Saturday, April 18, 2015

मी



वाढलेल्या पानातील
मिठाचा मी खडा होतो
मान्य आहे मला
मी थोडा वेगळा होतो. १ .

दूर राहून मदत करण्यात
मी जरा रमून असायचो
तोंडी लावण्यासाठी घेतलेला
लोणच्याचा खार असायचो .२.

पत्रावळीमध्ये असलेला
पानाचा मी भाग होतो
तुमच्याविना जगताना
मृत्यूचाही श्वास होतो .३.

थंडावलेल्या वरणावरची
तुपाची मी धार होतो
समूहामधला छोटासा
कोपऱ्यामधला भाग होतो .४.

जेवण झाल्यावर संपलेला
टाकावू कचरा होतो
दूर जाताना पाहणारा
वेडा मी आभास होतो .५.

धुण्यासाठी भिजवलेल्या
हातावरचं पाणी होतो
तुमच्याविना मी एक
प्राण गेलेला मुडदा होतो .६.

भोजनानंतर खाण्याची मी
पानसुपारीची चव होतो
तुम्ही आलात म्हणूनच मी
आजवर जिता होतो .७.
                        स्वानंद नंदकुमार मराठे
                        १६/०४/२०१५
                        २०:३३ वा.

No comments:

Post a Comment