Tuesday, February 23, 2016

येता तू चालत अशी



येता तू चालत अशी
लाडीक मजकडे पाहुनी
टाकला कटाक्ष मी ही
तुझ्या त्या नयनी

दुःख क्षणभर विसरुन गेलो
तुला सामोरी बघुनी
जीव गुंतु लागला तुझ्यात
जणू अर्थ लाभला जीवनी

थरथरत्या अधरांची मोहक
हालचाल गेलीस करुनी
घायाळ झाली काया
तुझ्या कवेत जाऊनी

पाहू लागलो आनंदास
तुझ्या त्या कवेतुनी
अचानक अदृष्य झालीस
माझ्या तू समोरुनी

भास होता बहुधा माझा
अलगद गेला विरुनी
क्षणात येऊन गेलीस
स्पर्षाची लाली चढवुनी

पुन्हा दिसलीस अचानक
हात दाखवताना दुरुनी
तुजकडे येऊ पाहत होतो
परी पाय सोडिना धरणी

पाऊसही बरसू लागला
तुही गेलीस भिजुनी
दुःखही आता अलगद
गेले अश्रुवाटे वाहुनी

स्वानंद नंदकुमार मराठे
04/02/2016
20:30 वा.
( कर्वेनगर पुणे )

No comments:

Post a Comment