Tuesday, February 23, 2016

जगदंबा



ती जीव लावते
जीव टाकते
जीव गुंतवते.
तुम्ही जीव घेता.

(ती सुद्धा जीव घेते
पण तिनंच घ्यावा
असं वाटावं
अशा पद्धतीनं!)

तुमचंच करताना
ती स्वत:ला विसरते
तुम्ही तिला विसरता.

ती सर्व सांभाळते
तुम्ही तिचं मन सुद्धा
सांभाळत नाही.

तुमच्या यशात ती
आनंद घेते
तुम्ही आनंदाच्या भरात
तिचा उल्लेख सुद्धा
विसरता.

तिचं अस्तित्वच सुंदर आहे
तुम्हाला शरीरापलिकडे
काही दिसत नाही.

ती जीवन सुंदर करते
तिच्या वाट्याला
विटंबना येते.

तुमचंच करता करता
तिला स्वत:चं काही
उरत नाही
तिला गृहीत धरता धरता
तुम्हीही तिचे उरत नाही.

तिचं रक्षण काय करणार
तीच तुमची तटबंदी आहे
तिला बंदी बनवून
तुम्ही आत्मघात करून घेता.

घरात ती लक्ष्मी बनून येते
तुम्ही तिचं पोतेरं करता
ती धनधान्याचं मापटं
घरात ओसंडते
तुम्ही तिच्या
आई-बापा सकट लुटून
तिचं मातेरं करता.

ती आई आहे, बहीण आहे
मैत्रीण, प्रेयसी, पत्नी
इत्यादी इत्यादी आहे.
तुमच्या लेखी ती
फक्त मादी आहे.

ती लक्ष्मी ती सरस्वती
ती दुर्गा गौरी उमा असते,

नि:पात केलेल्या दुष्टांच्या
कवट्यांची माळ
गळ्यात माळून
रक्तानं निथळणारं
राक्षसाचं मुंडकं
हातात धरून
लाल भडक जीभ
बाहेर काढत
ती अष्टभुजा आहे
चंडिका आहे.
तुम्ही शिवशंकर का होत नाही?
-Charu

No comments:

Post a Comment